Monday, 5 March 2018

जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग

......जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग ......

मला प्रांजळपणे असे वाटते की जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग खालील मुद्द्यावर आधारीत असावा.

0. नीतीमुल्यावर आधारीत असावा.

शेवटी आपण ज्या समाजाचे अविभाज्य घटक आहोत तो समाज सुद्रुढ रहायला नको का? तो शरीराने आणि मनानेही सशक्त सुद्रूढ व निरोगी असायला हवा. पैकी मानसिकता बनविण्याचे महत्वाचे कार्य समाजातील साहित्यिकाचे आहे. प्रत्येक समाजात, धर्मात जाती पाती या असणारच. ती ज्यांची त्यांची जीवन पद्धती आहे व त्याप्रमाणे जीवन जगण्याचा त्याना पूर्ण अधिकार आहे. त्यात जातीजातीमधे द्वेष करण्याचे काहीच कारण नाही. ऊलट प्रत्येकानी दुसर्या जातीचा मान व आदर राखला पाहीजे. समाजात खेळीमेळीने राहीले पाहीजे.
हे सर्व करणं अर्थात जातीय सलोखा ठेवणं साहित्यिकानी करावं . कारण साहित्यिक हा सर्व जातीपातीच्या परे असतो. म्हणूनच त्याला साहित्यिक म्हणतात. ही बिरूदावली वापरायची असेल तर जातीय सलोखा टीकवून ठेवणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. ते तो करीतही आहे पण त्याची तीव्रता कमी पडते किंवा त्यांची लेखणी या सामाजिक कार्यात कमी चालते त्यामुळे प्रबोधन कमी होते आहे असे म्हणावे लागेल. कारण जातीय दंगली कमी होत नाहीत. याची क्रुपया सर्व साहित्यिकानी नोंद घ्यावी अशी मी त्याना नम्र प्रार्थना करतो कि ज्यायोगे नितीमुल्ये जोपासली जातील.

0. जातीय द्वेष न भडकता सलोखा प्रस्थापीत करणे.

प्रत्येक साहित्यिकानी आपल्या सहकार्यावर लक्ष ठेवावे व जातीय द्वेष भडकविणाच चुकुनही क्रुत्य होणार नाही तसे काही लिखाण होणार नाही याची दक्षता घ्यावी. द्वेष हा आपला षडरीपूपैकी एक रीपू म्हणजे शत्रू आहे. त्याचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा अन्यथा याचं कधी वणव्यात रूपांतर झालं हे कळणारही नाही. म्हणून साहित्यिक राजा जागा हो रात्र वैर्याची आहे.

0. समाजमनावर सकारात्मक परीणाम करणे.

साहित्य हे समाजाचं करमणुकीचं व प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे. ते शस्त्रासारखं आहे आणि हे शस्त्र साहित्यिकाच्या हाती असतं. हे कसं सकारात्मक परीणामासाठी वापरायचं ही महत्वाची जबाबदारी साहित्यिकांची आहे. हे कसब त्यांच्या प्रत्येक साहित्य प्रकारात ऊतरावे. ही त्यांची सामाजिक बांधीलकी आहे. नाटक, सिनेमा, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, वॉटसप, ईंटरनेट, फेलबूक, ट्वीटर ईत्यादी विविध माध्यमातून साहित्यिकानी त्यांचे मत सकारात्मक पद्धतीनेच मांडताहेत ना याची वेळोवेळी खातरजमा करावी व त्यावर अगदी आग्रही असावे.

0. साहित्यिकानी मार्गदर्शक, आग्रही, मनस्वी असावे.

साहित्यिकाचे समाजातील स्थान फार महत्वाचे आहे. समाजमनाचा ठाव घेणारं आहे. समाज त्यांचं मनापासून ऐकतो कारण नाही म्टलं तरी खरंच साहितियिक हा समाजमनावर काज्य करणारा सम्राटच असतो. तो समाजात त्याच्या लेखणीतून डोकावतो. समाजमनाला कुरवाळतो व खडसावतोही. तो आग्रही असतो. समाजाचं मार्गदर्शन करतो. तो हे सगळं अगदी मनापासून करतो म्हणूनच तर तो समाजाचा गळ्यातला ताईत असतो.अशा समाजाप्रती त्याने क्रूतज्ञता ठेवणं व या माध्यमातून जातीजातीत सलोखा ठेवणं अत्यंत आगत्याचं आहे.

0. प्रक्षोभक, अरेरावीपणा, गलीच्छ , भडक, द्वेषपूर्ण साहित्य टाळावे ( काही अपवाद तेही चांगल्या परीणामासाठी)

काही सात्यिकाना ही सवय असते. त्याना हे कळत नाही की एका जातीवर अनुकूल भडकावू लिखाण केल्यानं दूसरी जात त्याच्यावर नाराज होणार आहे.मग त्याला पाठींबा म्हणून दूसरा साहित्यिक तसाच लिहीतो. तिसरा त्याचा विरोधात लिहीतो. हे असे सारे लिहीणारे समाजकंटक आहे. विकावू साहित्यिक आहेत याची खूणगाठ समाजातील प्त्येकजणानी बांधून ठेवण्याची गरज आहे. कडक, भडक, क्रांतीकारी आवश्य लिहावे पण त्याचा आपेक्षित परीणाम चांगल्यासाठी असेल तरच. जसे की पोवाडा, क्रांतीगीत, समरगीत, अन्यायाविरूद्ध ऊठव करणारी गीते कविता, नाटके, धारावाहीके ईत्यादी की ज्यामुळे अनिष्ट रूढी परंपरा, जातीय द्वेष समाजातून ऊखडून बाहेर फेकले जातील.

0. वाचकाची नस पकडता आली पाहीजे.

वाचकाना पटेल, रूचेल , ऊमगेल अशा पद्धतीचे लिखाण करावं.


वास्तवाचं भान ठेवून, समाजमनाची नस ओळखून लिखाण केलं तर लोक जातीपाती विसरून एक होतील. जातीय सलोखा निर्माण होईल. आणि अगदी हेच साहित्यिकाकडून आपे़क्षित आहे. समाजाप्रती हे त्यांचं देणं आहे. हे समाजरूण त्यानी फेडलं तर त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.

असो तर जातीपातीच्या परे जावून आपण आपल्या सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून लिखाण केलं तरच आपण समाजाप्रती क्रुतज्ञ राहूत आणि राहणारच आहोत अशी ग्वाही देऊन ईथे मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.

No comments:

Post a Comment