Monday, 5 March 2018

विचार : स्थिर व अस्थिरतेचा

......... विचार : स्थिर व अस्थिरतेचा .......

   आज मनुष्य कधी नव्हे इतका अस्थिर बनत चालला आहे. सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना देखील, तो खऱ्या सुखापासून मनःशांतीपासून कोसो दूर आहे. भौतिक सुविधा वाढल्या आहेत पण त्याची दुःखे अजूनच वाढत चालली आहेत.  रोज नव्या अडचणी , नवे प्रश्न , नवी आव्हाने यामुळे अनेक प्रकारच्या चिंता , तणाव याने तो घेरलेला आहे . विज्ञानाने तो आर्थिक व भौतिक दृष्ट्या जरी स्थिर झाला असला तरी त्याचे शारीरिक श्रम कमी झाले पण मानसिक पातळीवर तो अधिकाधिक कमकुवत बनु लागला आहे.
  रोजमर्राच्या  समस्या तर वाढल्या आहेतच पण छोटे छोटे issues देखिल त्याला कमकुवत बनवून त्याचे स्वास्थ्य हिरावून घेत आहेत.
असे का? कशामुळे? थोडा विचार करू यात.
माणूस जसजसा निसर्गापासून दूर चालला आहे , तसतसा तो अधिक अस्थिर होऊ लागला आहे . आज पुन्हा सामाजिक व आर्थिक विषमता डोके वर काढू लागली आहे तथाकथित अवैचारिक विध्वंसक शक्तींना मोकळे रान मिळत आहे की काय अशी स्थिती निर्माण होत आहे . भ्रष्ट व्यवस्थेला चालना मिळत असल्याने सामाजिक स्तरावर त्याचे दुष्परिणामच दिसून येतात . अनेक दुर्गुणांची जोपासना होत आहे. ते सद्गुण असल्याचा भास निर्माण केला जात आहे. भ्रष्टाचाराला, अनीतीला, दुर्गुणाला प्रतिष्ठा लाभत आहे. हे सर्व करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यातलेच ईंग्रज आहेत. बाह्य ईंग्रज घालवले पण आतले ईंग्रज अजून तळ ठोकून आहेत. कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत. ते सर्व माणसाला रसातळालाच नेत आहेंत. एका बाजूला मॉल ,इमारती ,कॉर्पोरेट एरिया तर दुसऱ्या बाजूला भीषण दारिद्र्य , झोपडपट्ट्या , गलिच्छ अस्वच्छ वातावरण. याचा सुवर्णमध्य साधता आला तर मग त्याला रामराज्यच म्हणू यात. पण घोडं कुठं पेंड खातय ते शोधणं प्रामुख्यानं गरजेचं आहे.
सद्याची स्थिती अशी आहे.
देश पुढे जाण्याऐवजी मागेच येत आहे की काय असे वाटते. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे . कर्जबाजारीपणा , जमिनीचा नापिकपणा , नैसर्गिक आपत्ती , उत्पन्नातील घट , शेतमालाला भाव न मिळणे यासारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे.
 खऱ्या अर्थाने या आधुनिक युगात वावरताना आपण कितपत विकसित झालो आहोत? खऱ्या अर्थाने आपण वैचारिक दृष्ट्या किती सुसंपन्न झालो आहोत ? प्रगत तंत्रज्ञान , आधुनिक जीवनशैलीं ने आपले खरेच कल्याण झाले आहे का ? आपण सुखी झालो आहोत का हा मोठा प्रश्नच आहे
 दिवसेंदिवस वाढणारी तणावग्रस्तता , चिंता , परस्पर संबंधातील कटुता ही आधुनिक युगाची मोठी देन आहे.

आता महत्वाच्या विषयाबद्दल म्हणजेच जीवनाच्या साराबद्दल विचार करू यात.

निसर्गात स्वतःची अशी एक स्थिरता आहे की जी आपल्याही तनामनात वास करून आहे . कारण आपण निसर्गाचाच एक अंश आहोत. असे असले तरी आपल्या आगाऊपणामुळे ह्या स्थिरतेपासून खरे तर आपण दूर चाललो आहोत . त्यामुळे विभिन्न विकृत समस्यांच्या जाळ्यात आपण अडकत आहोत.
   बारकाईने निरीक्षण केल्यास ह्या सृष्टीचा निसर्गाचा स्वतःचा असा एक ताल आहे , स्वतःचे असे एक नृत्य आहे , संगीत आहे.
 सृष्टीचे हे एक अगाध असे रहस्य आहे . सृष्टीत जी स्थिरता व्यापून आहे ती निसर्गात गेल्यावरच आपल्यात उमलते.
नीट लक्षात घ्या , अस्थिरतेनेच आपली कामे बिघडतात . पण स्थिरता ही कामना जुळवून आणते.  स्थिरता ही आपल्याला असंभव वाटणारी , पण मुळात ती संभव असतात अशीच कामे घडवून आणते. ती आपला आवाका अचूक जाणते. त्यानुळे ती आपल्याला आततायीपणाकडे जावू देत नाही. निसर्गाचा तोल सांभाळून त्यास समतोस ठेवण्याचा प्रयत्न करते. समोर ठाकलेल्या चिंता , अडचणी यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग स्थिरताच दाखवते.  स्थिरता आपल्यातच एखाद्या समस्येचे मुळ शोधण्यास मदत करते किंवा त्या समस्याच गायब करून टाकते.
   आज उभी असणारी अनेक आव्हाने , प्रश्न याची उत्तरे कुठे बाहेर शोधण्याची गरज नाहीये तर ती आपल्या स्थिर मनोवृत्तीतच आढळून येतात. हे खरे निसर्गाचे रहस्य आहे. हे आपण जाणून घेतले पाहीजे.
   स्थिरता ही सर्व प्रकारच्या आंतर व बाह्य गोंधळाला संपुष्टात आणते . आपल्याला शारिरीक व मानसिक दृष्ट्या स्थिर व्हावे लागणार आहे जी आपली प्राचीन परंपरा आहे.
आत्मिक दृष्ट्या जेव्हा आपण स्थिर होऊ लागतो तेव्हा आपल्या जीवनाला खरे वैभव प्राप्त होते. तो आपल्या जीवनाचा सुवर्णकाळ असतो.
     मानवाचे खरे कल्याण ह्या स्थिरतेत आहे. स्थिरता ही निसर्गाची मूळ अवस्था आहे. त्यामुळे निसर्गाची रचना कधीही डळमळीत होत नाही.
  अस्थिर मन हेच अनेक अपयशाचे कारण आहे. स्थिर मनाने घेतलेले निर्णय हे नेहमी यशकडेच घेऊन जातात. अस्थिरतेत अपयश निश्चित आहे. चिडचिड, मनस्ताप आहे.
  स्थिरतेचा हा ध्यास मानवाला त्याच्या कल्याणाकडे , खऱ्या वैभवाकडे घेऊन जाणारा आहे. प्रश्न हा आहे की हे सर्व आपण समजून ऊमजून घेणार का? आणि समजून घेतले तरी आचरणात आणणार का?
बघू यात, आपणच आपल्या जीवनाचे अर्थातच मानसिकतेचे शिल्पकार आहोत.
शुभस्य शिघ्रम ! शुभम भवतु !!

No comments:

Post a Comment