Monday, 5 March 2018

शिक्षण : विकासाचा पाया

शिक्षण : विकासाचा पाया.

ईग्नाईट पुरस्कार वितरण प्रसंगी मा. डा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी व्यक्त केलेले मौलिक विचार असे, “ शिकण्याने निर्मितीक्षमता येते, निर्मितीक्षमतेने विचारशीलता प्रकट होते, विचारशिलतेने ज्ञान मिळते आणि ज्ञान तुम्हाला महान बनविते. रचनात्मकता + धर्मभाव + साहस = ज्ञान.”
भारताला ऋषीमुनींची परंपरा आहे. त्यांच्या ज्ञानाने आपली शिक्षण प्रणाली बनलेली आहे. भारतीय संस्कृती मोठा इतिहास घेवून आपल्या समोर मानसशास्त्राच्या भक्कम पायावर उभी आहे. मानवी मनाचा खूप मोठा विचार व संस्कार त्यात आहे. आपल्या संस्कृतीत फक्त व्यक्तीपुरता विचार अजिबात अभिप्रेत नाही. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. म्हणून समाजाचाही विचार त्यात आहे. फक्त समाजच नव्हे तर पूर्ण विश्वाचा विचार आहे. म्हणून तर आपल्या ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘हे विश्वची माझे घर.’
आपली संस्क्रूती विश्वाला घर मानणारी आहे. संस्कार शिक्षण प्रणालीतील फार महत्वाचा घटक आहे. संस्कारमय व्यक्ती घडविणे हाच शिक्षणाचा मुख्य हेतू आहे, शिक्षण हा विकासाचा पाया आहे, अशी आपली संस्कृती सांगते.
व्यक्ती, समाज, अवती भवतीचे वातावरण यावर संस्कार व शिक्षण अवलम्बून असते. मुळ पाया भक्कम भरून मग त्यावर विश्वव्यापकतेची इमारत उभी राहते. तो पाया आपण आपल्या आईच्या  भाषेत, त्या  संस्कारातच बांधला पाहिजे म्हणजे मग विकासाची गंगा अविरत घरोघरी पोहोचेल. जीवनासाठी शिक्षण असते , शिक्षणासाठी जीवन नव्हे.
भारतीय परंपरेत विज्ञान आणि तत्वज्ञान गच्च भरलेले, अतिप्राचीन आहे. ते ज्ञान जगभरातून कौतुकाने गौरविले जात आहे. हे ज्ञान ते लोक आपल्यापासून घेऊन जातात, नवीन आवरणात परत जगाला देतात. उदाहरण म्हणजे योग आपल्या भारतीय समाजरचनेचा आणि शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. हे जगही मान्य करते.  शिक्षण हा समाजजीवनाचा आरसा असला पाहिजे. समाज घडविण्याचे, त्याचा विकास करण्याचे  काम शिक्षणाचे आहे. आपल्या संस्कृतीच्या आस्तीत्वासाठी शिक्षण घ्यायचे आहे.. त्यापासून कोणीही दूर राहू नये असे मला वाटते.
तक्षशीला व नालंदा सारखी विद्यापीठे ठीकठीकाणी  अस्तित्वात यावीत. ज्या जिद्दीच्या व इच्छाशक्तीच्या बळावर जपानने स्वतःचा कायापालट केला, त्याच पुंजीच्या आधारावर देश विकास करतात, हा शाश्वत सिद्धांत आहे. असा सिद्धांत स्वबोधानेच जगतो.
थोमास मन्रो नावाच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याने फार समर्पक विधान केले होते.
” इंग्लंड आणि भारत यांनी समजा, आपल्या व्यापारात संस्कृतीची आयात निर्यात करण्याचे ठरवले तर भारतातून संस्कृतीची आयात करणे इंग्लंडच्या फायद्याचे सिध्द होवील.”  किती बोलके, वास्तवाला धरून विधान आहे. कारण शिक्षण म्हणजेच संस्कार असे आपली भारतीय संस्कृती सांगते.
शिक्षण पायाभूत असावे म्हणजे विकास घडला जातो. अन्यथा मनुष्य आणि पशु यात फरक तो काय ? शिक्षणामुळे माणूस विचार करायला शिकतो आणि विचार केल्यावर आणखी शिक्षण घेतो. अशी ही श्रुखला अमर्याद सुरु राहते. यातून माणूस परिपूर्ण बनण्याची प्रक्रिया होते. माणूस स्व ला जाणतो आणि स्व ला जाणण्यासाठी जे शिक्षण ते खरे शिक्षण कि जे जीवनाचा विकास घडवते. कारण शिक्षण हाच विकासाचा पाया आहे.
ज्ञान वाढते आहे. कुठलीतरी श्रद्धा आवश्यक आहे आणि ही मानसिक आवस्था आहे. मनाशिवाय शरीर नाही तसे अध्यात्मिकतेशिवाय विज्ञान नाही. आत्मा आणि शरीर मिळून माणूस तयार होतो. हे विसरून चालणारच नाही . हे त्रिवार सत्य आहे. वैश्विक सत्य आहे. आत्मा विज्ञानदृष्ट्या सिद्ध करता येत  नाही हे आपणाला पक्के माहित आहे. अनुभूती आहे की आत्म्याशिवाय शरीर जिवंतच राहू शकत नाही . हे सर्व ज्ञान संस्कार देणारे शिक्षण आपणाला पाहीजे आहे कि ज्यायोगे विश्व तणावरहित होईल, विश्वाचे  कल्याण होयील व विकास होयील.
दृष्टी बदलली पाहिजे. ऐकून नव्हे तर पाहून शिक्षण  दिले गेल पाहिजे . यात आचार  विचार महत्वाचे आहेत. मुळ संकल्पना महत्वाची आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखाने जगा. सुख महत्वपूर्ण आहे. सुखाची निट ओळख झाली पाहिजे. ते निट समजून घेतले पाहिजे. सुख चिरकाल टीकणारे हवे. जीवनाच प्रयोजन हे आहे कि आपण दीर्घ आणि सुखाने जगावे. आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या प्राण्यांच्या गरजा आहेत पण मनुष्य प्राणी हा त्याहून वेगळा आहे. त्या चार गोष्टी म्हणजे मनुष्यासाठी जीवन नव्हे. ते तर हवेच पण त्याहून वेगळे काही तरी मनुश्यास हवे असते. मनुष्य सामर्थ्याने जीवन जगतो. शिक्षणाचा उपयोग करून घेतो. बलवान आणि दीर्घ आयुश्य सुखाने जगतो तो माणूस. या संघर्षात ताण तणाव नकोत. सबका विकास खुदके साथ, यासाठी धर्म आवश्यक आहे. Man does not live by bread alone. स्वधर्माच्या पालनात त्याला शाश्वत सुख मिळते. शिक्षित मनुष्य हा धारक बनायला हवा. ते धारण केलेले शिक्षणच त्याला पडू देत नाही. ते शिक्षण आपल्याला अभिप्रेत आहे. ते आपल्या भारतीय संस्क्रूतीत आहे. शाश्वत सुख, स्वधर्माचे पालन, धारणात धर्म, इहलोकात आणि परलोकातही, दोन्हीकडे सृष्टीला चालविण्याचे काम शिक्षणाने केले पाहिजे, ते खरे शिक्षण. जड आणि चेतन या दोन्हीनाही धर्म जोडतो. या एकत्रीकरणात सुख आहे. ज्ञान आणि विज्ञान जोडले जावे. विद्यार्जनाने अमृत मिळाले पाहिजे फक्त रोटी नाही. ही समग्र ज्ञानाची दृष्टी आमची प्राचीन शिक्षणनिती आहे. सा विद्या या विमुक्तये. फक्त सक्षम प्राणी होणे हे विदयेचे ध्येय नाही. मनुष्याची वास्तविक स्वतंत्रता. स्वला ओळखणे. यात मनमानी नाही. स्वरूपातून निघणारी स्वाभाविकता आहे. मरण येत नाही म्हणून जगतो याला काही अर्थ नाही. या व अश्या अनेक अविचारातून मुक्त करते ती विद्या. ती मनुश्याला पोषक बनवते, निर्मिती क्षमता देते. त्याला शिक्षण म्हणतात. हे अव्वल दर्जाचे शिक्षण, दिसत नाही. ते दिसण्याच्याही पलीकडचे असते. त्यासाठी प्रयोग करा. तेही श्रद्धेने. श्रद्धा... श्र म्हणजे श्रम व धा म्हणजे धारण. श्रम करून धारण केले जाते ते. म्हणजे श्रद्धेने तपासा. प्रश्न करा आणि मग विश्वास पटल्यावर धारण करा. शिक्षण देणारा भरोसेवाला असावा. ईश्वराला कुणी पाहिले आहे ? तरी पण आपण विश्वास ठेवतो. तो श्रद्धेय असतो. रामकृष्ण परमहंसासारखा. अशी मंडळी शिक्षण क्षेत्रात हवीत. वेदाने सांगितले तरी तर्काच्या ऐरणीवर घासून तपासून पाहा. प्रयोग करा. चाणक्याने सगळे प्रयोग स्वतः केले अन मग ते अस्तित्वात आणले. म्हणून अनुभव, अनुभूती महत्वाची आहे. त्यासाठी शिकणारा कसा पाहिजे? नम्र, श्रद्धाळू, सेवाभावी, ऐकून पाहून मनन चिंतन करून प्रयोग करून अनुभव घेवून आचरणात उतरवणारा हवा. ही दृष्टी  सतत सर्व ठिकाणी हवी.
शिक्षणाने आपल्याला काय मिळते ?
1. सर्वांबरोबर सामंजस्याने राहण्याची क्षमता.
2. स्वतःची क्षमता.
3. व्यक्तित्व विकास.
4. क्षमता व्यक्त करण्याची कला.
5. नम्रता.
6. संवेदना...परपीडा जाणणारा.
7. विवेकी ज्ञान. ( विवेकहीन ज्ञान रडवते.)
8. विज्ञान आणि तत्वाचे मूल्य.
9. उन्नत शांती देणारे ज्ञान.
10. स्वगौरव, स्वतःची प्रतीष्ठा, आत्मविश्वास, निर्भयता.
11. कुशल ज्ञान.
12. सद्गुण युक्त मनुष्यता.
13. कार्य तत्परता....स्वान्त सुखाय, बहुजन हिताय.

शिक्षणासाठी काही तत्थे, पत्थे असावीत असे मला वाटते ती अशी.....
1. शिक्षण हे आपल्या मातृभाषेतूनच असावे. आपल्याला ज्या भाषेतून स्वप्ने पडतात ती आपली  भाषा. जीवनाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद आपणाला आपल्या मातुभाषेतुनच मिळतो. म्हणून आपले शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे.
2. शिक्षण सर्वसमावेषक असावे.
3. सर्वाना सुलभरीत्या घेता यावे.
4. सर्वोत्तम, गुणवत्तापूर्ण असावे. सशक्त शास्त्रासाठी हे आवश्यक आहे.
5. विद्या मुक्त करी म्हणजे सर्व बंधनातून मुक्त करणारी, विद्या युक्त करी म्हणजे योग्य करणारी, विद्या अर्थ करी, असे सर्वांगीण शिक्षण असावे.
6. शिक्षण अनुभूती देणारे असावे.
7. व्यावहारिक ज्ञान देणारे असावे.
8. अगदी गर्भसंस्कारापासून ते वैज्ञानिक संशोधनापर्यंत सर्वव्यापक असावे.
9. शासनमुक्त व स्वायत्त असावे.
10. समाजपोषित व समाजाधारित असावे.

No comments:

Post a Comment